राबडी देवी, तेज प्रताप ईडीसमोर हजर   

लालू प्रसाद यांना समन्स

पाटणा : बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी आणि त्यांचे आमदार पुत्र तेज प्रताप यादव मंगळवारी अंमलबजावणी संचालनालयासमोर हजर झाले. दरम्यान, राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनादेखील ईडीने समन्स बजावले आहे. त्यानुसार, लालू प्रसाद यादव यांना उद्या (बुधवारी) ईडीसमोर चौकशीसाठी हजर व्हावे लागणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. हे सर्व प्रकरण जमिनीच्या बदल्यात रेल्वेत नोकरीशी संबंधित आहे.
 
राबडी देवी काल सकाळी मोठी कन्या आणि पाटलीपुत्रच्या खासदार मिसा भारतीसह येथील बँक रोडवरील ईडी कार्यालयात पोहोचल्या. यावेळी आरजेडीचे शेकडो कार्यकर्ते त्यांच्यासमवेत होते. तेज प्रताप हेदेखील ईडीच्या कार्यकर्त्यांसमोर हजर झाले. या प्रकरणात काही अतिरिक्त तथ्ये समोर आली आहेत. त्यामुळे नव्याने चौकशी करणे आवश्यक आहे. या तिघांचे पीएमएलएअंतर्गत जबाब नोंदवले जातील, असे अधिकार्‍यांनी सांगितले. विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी भाजप केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप आरजेडीचे प्रवक्ते एजाज अहमद यांनी केला. ऐन निवडणुकांच्या तोंडावर भाजपकडून अशी खेळी केली जात असल्याचेही ते म्हणाले.
 
या प्रकरणात लालू प्रसाद, राबडी देवी, तेजस्वी यादव यांची ईडीने आधीदेखील चौकशी केली आहे, असे ही ते म्हणाले.गेल्या वर्षी ईडीने लालू प्रसाद आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात दिल्ली न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. या आरोपपत्रात राबडी देवी, मिसा भारती  आणि हेमा यादव यांना सहआरोपी करण्यात आले होते.

Related Articles